कडाक्याच्या ऊन्हाने पुणेकर घामाघूम   

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरातील तपमानात सातत्याने वाढ होत आहे. तपमानाचा पारा वाढल्याने बाहेर ऊन्हाच्या झळा, तर घर आणि कार्यालयात प्रचंड उकाड्याने पुणेकर घामाघुम होत आहेत. सोमवारी लोहगाव परिसरात ४२.६ अंश कमाल तपमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस हे तपमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज सोमवारी हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
शहर आणि परिसरात सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी त्यात भर पडत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावरील वाहनांसह माणसाची गर्दी कमी होत आहे. उन्हामुळे घराबाहेर पडण्यास टाळत आहेत. तसेच कार्यालयातील लोकही बाहेर पडताना विचार करत आहेत. परिणामी मध्य वस्तीत विविध प्रकारच्या बाजारपेठेत ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. घर, कार्यालय तसेच विविध प्रकारच्या ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांना फॅन, एसी, कुलचा वापर करावा लागत आहे. 
 
सायकाळपर्यंत उकाडा कायम रहात असल्याने लोक सकाळच्या सत्रातच घराबाहेरची कामे उरकून घेत आहेत. अत्यंत महत्त्वाचे काम असेल, तरच लोक दुपारी घराबाहेर पडत आहेत. कार्यालये सुटल्यानंतर मात्र बाजारपेठ आणि रस्त्यांवर गर्दी वाढत आहे. वाढलेल्या तपमानामुळे ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागातर्फेही उन्हात घराबाहेर पडणे टाळा असा सल्ला दिला जात आहे. शहरात पुढील चार दिवस हवामान कोरडे असणार असून आकाश नीरभ्र असणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शहरातील कमाल तपमान 

ठिकाण तपमान 
लोहगाव            ४२.६ अंश
कोरेगावपार्क     ४१.६ अंश
पाषाण ४१.४ अंश
शिवाजीनगर       ४०.८ अंश
मगरपट्टा ४०.५ अंश
एनडीए ३९.३ अंश
 

Related Articles